गर्जाविषयी

गर्जा महाराष्ट्र हा आयबीएन लोकमतवरील टाटा-इंडिकॉमने स्पॉन्सर केलेला कार्यक्रम. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचं उद्दीष्ट आहे ते गेल्या ५० वर्षात महाराष्ट्राची ज्या वेगवेगळ्या संस्थांनी आणि व्यक्तींनी जडणघडण केली आहे त्याविषयीचे माहितीपट प्रसारित करणे हे होय. शिक्षण, सहकार, उद्योग, समाजसेवा, क्रीडा, कला, संगीत अशा सर्वच क्षेत्रात काम करणा-या आणि तीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणा-या संस्थांवरचे माहितीपट या कार्यक्रमांतर्गत प्रसारित होत असतात. अशा संस्थांवरचे माहितीपट चित्रित करताना फिरणं ओघाने आलंच. या फिरण्यात अनेक माणसं भेटली. माहीत नसलेला महाराष्ट्र दिसला. या सगळ्यातून त्या त्या वेळी ती ती फिल्म मनात आकार घेत गेली. आयबीएन नेटवर्कचे कॅमेरा हेड राधाकृष्ण रासवे, आणि अशा नव्या गोष्टींना प्रोत्साहन देणारे आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे दोघांनीही टेक्नीकली आणि कंटेंटवाईज मार्गदर्शन केल्यामुळेच या कार्यक्रमाचा पहिल्या एपिसोडपासूनचा दर्जा आजही टिकून आहे.
कार्यक्रमासाठी या संस्थाची निवड करण्यात मंदार फणसे आणि चंद्रकांत पाटील यांनी आजवरचा त्यांचा अनुभव अगदी सहजगत्या मला दिला. आयबीएन लोकमतचे चॅनेल प्रोड्युसर उदया सिम्हा यांनी माझ्या प्रत्येक निर्णयावर विश्वास दाखवला. याबद्दल या सर्वांचे खरच आभार आहेत.
आणि ज्यांचा उल्लेख टाळून मला पुढे जाताच येणार नाही ते म्हणजे सीनिअर एडिटर शरद बढे आणि त्याची पूर्ण टीम... ही इतकी सुंदर एडिटिंग टीम नसती तर गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमाने मला कधीच सुख दिलं नसतं...
थँक्स टू ऑल.